जिल्हाताज्या घडामोडी

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे कुपटीत मोठी दुर्घटना टळली: डीपीवरील चार जिवंत तारा तुटून पडल्या : शाळा व ग्रामपंचायत कार्यालयाजवळील घटना, ग्रामस्थ संतप्त

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे कुपटीत मोठी दुर्घटना टळली:


डीपीवरील चार जिवंत तारा तुटून पडल्या : शाळा व ग्रामपंचायत कार्यालयाजवळील घटना, ग्रामस्थ संतप्त

📍 माहूर / सिंहवाणी ब्युरो :
माहूर तालुक्यातील मौजे कुपटी येथे महावितरणच्या कथित हलगर्जीपणामुळे मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालयालगत असलेल्या वीज वितरण (डीपी) केंद्रावरील चार जिवंत वीजतारा तुटून खाली पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.


सुदैवाने घटना घडली त्यावेळी त्या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी किंवा ग्रामस्थ नसल्याने संभाव्य जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच गावचे युवा सरपंच प्रफुल भुसारे यांनी तातडीने महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून वीजपुरवठा बंद करण्यास सांगितले. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कुपटी परिसरात डीपीमधून जाणाऱ्या वीजतारा वारंवार तुटत असून महावितरणकडून त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. अनेक डीपींवर आवश्यक फ्युज नसून थेट वायर जोडून वीजपुरवठा सुरू असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
ही घटना जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालय आणि गावातील मुख्य रस्त्यालगत घडल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. घटनेनंतर विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी महावितरणविरोधात निषेध व्यक्त केला.
ग्रामस्थांनी सांगितले की, गावातील बहुतांश वीजतारा सुमारे ५० वर्षांपासून बदलण्यात आलेल्या नाहीत. त्या जीर्ण झाल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. संपूर्ण गावातील जुन्या तारा तातडीने बदलून नवीन वीजवाहिन्या टाकाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
मागणीची दखल न घेतल्यास १५ ऑगस्ट रोजी युवा सरपंच प्रफुल भुसारे यांच्या नेतृत्वाखाली माहूर येथील महावितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
फोटो :
कुपटी गावातील डीपीवरून तुटलेल्या जिवंत वीजतारा. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button