SIR प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ अंतिम मुदत आता १७ ऑगस्ट; अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबरला

SIR प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ
अंतिम मुदत आता १७ ऑगस्ट; अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबरला
मुंबई / सिंहवाणी ब्युरो :
महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रिया अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मुदतवाढ जाहीर केली आहे. यानुसार, SIR प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत आता १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
या प्रक्रियेनंतर २४ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, नागरिकांना २३ सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करण्याची संधी मिळणार आहे. प्राप्त दावे-हरकतींवर सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा २२ ऑक्टोबरपर्यंत केला जाईल. त्यानंतर २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाने प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक मतदाराने आपले नाव, पत्ता आणि इतर तपशील काळजीपूर्वक तपासावेत, तसेच आवश्यक असल्यास वेळेत दुरुस्तीसाठी अर्ज करावा, असे आवाहन केले आहे.
यापूर्वी अंतिम मतदार यादी १९ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार होती. त्याआधी ही तारीख ७ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली होती. तसेच SIR प्रक्रिया पूर्वी २३ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र प्रक्रिया व्यापक आणि क्लिष्ट असल्याने यापूर्वी दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. आता पुन्हा मुदत वाढवून १७ ऑगस्ट करण्यात आली आहे.
या प्रक्रियेसाठी अधिक वेळ देण्याची मागणी विविध स्तरांतून होत होती. विधान परिषद सदस्य सतेज पाटील यांनीही SIR प्रक्रिया अधिक क्लिष्ट असल्याने एक महिन्याचा कालावधी अपुरा असल्याचे मत व्यक्त केले होते. मतदारांचा मतदानाचा अधिकार अबाधित राहण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.
SIR प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयाची घटनात्मक मान्यता
दरम्यान, बिहारमधील विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना भारताचे सर्वोच्च न्यायालय यांनी निवडणूक आयोगाला अशा प्रकारचे पुनरावलोकन करण्याचा घटनात्मक अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, वगळणे किंवा दुरुस्ती करणे हे निवडणूक आयोगाच्या अधिकारक्षेत्रातील काम असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
याचिकाकर्त्यांनी ही प्रक्रिया NRC प्रमाणे नागरिकत्व तपासणी असल्याचा आरोप केला होता. मात्र, न्यायालयाने निवडणूक आयोगाची भूमिका आणि अधिकार घटनात्मक चौकटीत असल्याचे स्पष्ट करत SIR प्रक्रियेला वैधता दिली आहे.
◆ महत्त्वाच्या तारखा :
SIR प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत : १७ ऑगस्ट २०२६
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध : २४ ऑगस्ट २०२६
दावे व हरकती दाखल करण्याची अंतिम तारीख : २३ सप्टेंबर २०२६
दावे-हरकतींचा निपटारा : २२ ऑक्टोबर २०२६
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध : २७ ऑक्टोबर २०२६