ताज्या घडामोडी

कुर कालवा बसरेवाडी येथे फुटला : कालवा फुटीचे सत्र थांबेना; पिकात पाणी, शेतकऱ्यांचा संताप

कुर कालवा बसरेवाडी येथे फुटला : कालवा फुटीचे सत्र थांबेना;

पिकात पाणी, शेतकऱ्यांचा संताप

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी:
बसरेवाडी (ता.भुदरगड) येथील कुर कालव्याच्या अस्तरीकरणावर तब्बल १७ कोटी रुपये खर्च करूनही कालवा फुटण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. बसरेवाडी येथे पहाटे कालवा फुटल्याने गट क्रमांक ६४ मधील ऊस पिकात पाणी तुंबले असून मशागत केलेल्या व पेरणी केलेल्या शेतांचे मोठे नुकसान झाले आहे.
काही महिन्यांपूर्वीच कालव्याचे अस्तरीकरण करण्यात आले होते. मात्र तीन फूट क्षमतेच्या कालव्यात तब्बल सहा फूट पाणी वारंवार सोडले जात असल्याने कालव्याची अवस्था दयनीय झाली असून शेतकऱ्यांच्या शेती आणि पिकांनाही फटका बसत आहे.अचानक शेतात पाणी घुसल्याने कर्ज काढून उभे केलेले पीक आणि मशागत केलेली जमीन पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मुदाळ ते मिणचे खुर्द या पट्ट्यातील हा कालवा शेतकऱ्यांसाठी विकासाचा नव्हे तर त्रास आणि धोक्याचा स्रोत ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.कोट्यवधी रुपये खर्चूनही कालवा वारंवार फुटत असल्याने पाटबंधारे विभाग व ठेकेदारांच्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान होत असताना हा निधी नेमका कोणाच्या फायद्यासाठी खर्च झाला, असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी, दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी तसेच संपूर्ण कामाची चौकशी करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
याबाबत पाटबंधारे विभागाच्या उपअभियंता दीप्ती पाटील यांनी सांगितले की,कालव्यात मेलेले छोटे जनावर टाकल्याने ते पाईपच्या तोंडाशी अडकल्यामुळे पाण्याचा विसर्ग थांबला.त्यामुळे पाण्याची पातळी वाढून कालवा फुटला. शेतकऱ्यांनी कालव्यात कचरा किंवा मेलेली जनावरे टाकू नयेत,असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी हा कालवा वारंवार फुटत असून अस्तरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा,अशी मागणी त्यांनी केली आहे.
फोटो:बसरेवाडी येथे कालवा फुटून बाहेर वाहणारे पाणी.


अस्तरीकरणाचा गोंधळ की संगनमत ?
कुर कालवा मुदाळ ते मिणचे खुर्द असा असून पाचवडेपर्यंत सात फूट अस्तरीकरण तर पाचवडेनंतर केवळ तीन फूट अस्तरीकरण करण्यात आले आहे. तीन फूट अस्तरीकरण असताना सात फूट पाणी सोडले जात असल्याने कालवा ताण सहन करू शकत नाही. हा तांत्रिक गोंधळ आहे की आर्थिक गौडबंगाल ? असा थेट सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.


अस्तरीकरण असूनही पाणी मुरते; आम्ही हतबल”
“कालवा फुटण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. शासनास संवेदना आहेत की नाहीत. अस्तरीकरण होऊनही पाणी मुरते आणि ओव्हरफ्लो होते. आम्ही कर्ज काढून शेती करतो आणि क्षणात सगळे वाहून जाते. नुकसानभरपाई द्यावी व संबंधितांवर कठोर कारवाई करावी,”
सागर चव्हाण, दारवाड नुकसानग्रस्त शेतकरी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button