जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रविशेष

⭕ सिंहवाणी विशेष वृत्त आजरा तालुक्यात पुन्हा पट्टेरी वाघाचे दर्शन! पेरणोली–गवसे परिसरात वाघ दिसल्याची चर्चा; राधानगरी–भुदरगडच्या जंगलातून वाघाची अधूनमधून भटकंती

सिंहवाणी विशेष वृत्त

आजरा तालुक्यात पुन्हा पट्टेरी वाघाचे दर्शन!
पेरणोली–गवसे परिसरात वाघ दिसल्याची चर्चा;

राधानगरी–भुदरगडच्या जंगलातून वाघाची अधूनमधून भटकंती

सिंहवाणी ब्युरो | गारगोटी
आजरा तालुक्यातील पेरणोली आणि गवसे परिसरात पट्टेरी वाघ दिसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये उत्सुकतेबरोबरच काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राधानगरी, भुदरगड आणि आजरा तालुक्यांतील सह्याद्रीच्या घनदाट जंगल पट्ट्यात पट्टेरी वाघाचे अधूनमधून दर्शन होत असल्याची माहिती आहे. जंगलातील नैसर्गिक अधिवास आणि वन्यजीवांच्या भ्रमणमार्गामुळे या भागात वाघांची हालचाल होत असण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे राधानगरी वन्यजीव अभयारण्यात वाघांच्या अस्तित्वाची वनविभागाकडून यापूर्वीच कॅमेरा ट्रॅपद्वारे नोंद झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात पर्यटकांनाही राधानगरी-दाजीपूर परिसरात वाघाचे दर्शन झाले होते.

मात्र, पेरणोली–गवसे परिसरातील ताज्या दर्शनाची वनविभागाकडून अधिकृत पुष्टी होणे आवश्यक आहे.

*वनविभागाने लक्ष देण्याची गरज*

वाघाच्या संभाव्य वावरामुळे वनविभागाने परिसरात गस्त वाढवून कॅमेरा ट्रॅपद्वारे हालचालींची खातरजमा करावी. शेतकरी, गुराखी आणि जंगलालगत राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वन्यजीवांचे संरक्षण आणि मानवी सुरक्षितता या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. नागरिकांनी वाघ दिसल्यास त्याच्या जवळ जाणे, पाठलाग करणे किंवा गर्दी करणे टाळावे.

*सिंहवाणीचे आवाहन :*
पेरणोली–गवसे परिसरात वाघ दिसल्याची प्रत्यक्ष माहिती, ठिकाण किंवा वनविभागाची अधिकृत माहिती नागरिकांकडे असल्यास सिंहवाणीशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button