श्रीहरीकाका मठात गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात: आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धेत गोरंबेच्या गुरुमाऊली भजनी मंडळाचा प्रथम क्रमांक; शिपूरचे शिवभक्त द्वितीय

श्रीहरीकाका मठात गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात
आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धेत गोरंबेच्या गुरुमाऊली भजनी मंडळाचा प्रथम क्रमांक; शिपूरचे शिवभक्त द्वितीय
सिंहवाणी ब्युरो / गडहिंग्लज :
हत्तरगी-यमकनमर्डी येथील पुरातन श्रीहरीकाका गोसावी भागवत मठात गोकुळाष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. अष्टमीनिमित्त गोपाळकाला पीठाधीश डॉ. आनंद गोसावी यांच्या दिव्य सानिध्यात चीफ ट्रस्टी वेणुगोपाल गोसावी यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. यानिमित्ताने दिवसभर विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि संगीतविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धेत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भजनी मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धेत कागल तालुक्यातील गोरंबे येथील गुरुमाऊली भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावत २१ हजार रुपयांचे बक्षीस मिळविले. गडहिंग्लज तालुक्यातील शिपूरच्या शिवभक्त भजनी मंडळाने द्वितीय क्रमांकासह १५ हजार रुपयांचे बक्षीस, तर करवीर तालुक्यातील म्हारुळच्या माऊली भजनी मंडळाने तृतीय क्रमांक मिळवत १० हजार रुपयांचे बक्षीस पटकाविले.
उत्तेजनार्थ बक्षिसे
उत्तेजनार्थ विभागात कुद्रेमनी (जि. बेळगाव) येथील वाल्मिकी भजनी मंडळाने प्रथम, गडहिंग्लजच्या काळभैरी भजनी मंडळाने द्वितीय, समर्थ महिला भजनी मंडळाने तृतीय, तर दत्त महिला भजनी मंडळाने चतुर्थ क्रमांक मिळविला.
वैयक्तिक पुरस्कार
स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट गायक म्हणून नंदकुमार केसरकर (कुद्रेमनी), उत्कृष्ट वादक म्हणून अंकुश सावंत (शिपूर) आणि उत्कृष्ट महिला गायिका म्हणून विजया कुलकर्णी (गडहिंग्लज) यांची निवड करण्यात आली.
स्पर्धेतील विजेत्यांना सुप्रसिद्ध गायिका मंजुषा कुलकर्णी-पाटील यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त विविध दर्जेदार सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमांनी मठ परिसर भक्तिमय झाला. रेडिओस्टार सौ. मानसा गोसावी-ग्रामपुरोहित यांचा गीत गोपाल कार्यक्रम, सौ. स्वरदा पटवर्धन (सांगली) यांचे श्रीकृष्ण जन्म कीर्तन, पंडित सुधीर पोटे (कोल्हापूर) यांचे सुश्राव्य कीर्तन, पंडित ओंकार करकुंबी (घटप्रभा) यांचे शास्त्रीय संगीत तसेच मंजुषा कुलकर्णी-पाटील यांचे भक्तिगीत गायन झाले.
या उत्सवाला खासदार विशाल पाटील, जयश्री मदन पाटील, माजी आमदार राजेश पाटील, बजरंग देसाई, विश्वेश्वरया टेक्निकल युनिव्हर्सिटी, बेळगावचे रजिस्ट्रार एम. बी. रामपुरे, यूजीसीचे सहसचिव डॉ. मधुकर वावरे, अरविंद देशपांडे, अॅड. एस. एम. कुलकर्णी, कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, अभिनवचे डॉ. अमोल पाटील यांच्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हरीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोकुळाष्टमीच्या निमित्ताने मठ परिसरात दिवसभर भक्ती, संगीत आणि अध्यात्माचा सुरेल संगम अनुभवायला मिळाला. विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर ‘गोविंदा’च्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.