राजमाता हायस्कूल, खानापूरला ‘आदर्श शाळा पुरस्कार’ : शैक्षणिक गुणवत्ता, नाविन्यपूर्ण उपक्रमांसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची दखल

राजमाता हायस्कूल, खानापूरला ‘आदर्श शाळा पुरस्कार’
शैक्षणिक गुणवत्ता, नाविन्यपूर्ण उपक्रमांसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची दखल
सिंहवाणी ब्युरो / खानापूर, :
एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ‘आदर्श शाळा पुरस्कार २०२६’ सोहळ्यात खानापूर येथील राजमाता हायस्कूलचा मानाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
शाळेने शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम, वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन, कला-संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्काराच्या यशामागे मुख्याध्यापिका आर्या पाटील, अध्यक्ष राजेंद्र पाटील, सचिव मानसिंग दबडे आणि उपाध्यक्ष उदय पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संचालक मंडळाच्या योगदानामुळे हे यश शक्य झाल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.
पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते राजमाता हायस्कूलच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. या पुरस्कारामुळे शाळेच्या शैक्षणिक वाटचालीला नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली असून, खानापूर परिसरातून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.