विद्यार्थ्यानी व्यवसाय म्हणून शेती स्वीकारली पाहिजे – शेती मित्र शरद देवेकर : कृषी तंत्रनिकेतन गारगोटी येथे वार्षिक स्नेहसंमेलन

विद्यार्थ्यानी व्यवसाय म्हणून शेती स्वीकारली पाहिजे – शेती मित्र शरद देवेकर
कृषी तंत्रनिकेतन गारगोटी येथे वार्षिक स्नेहसंमेलन
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी –
श्री मौनी विद्यापीठ गारगोटी संचलित कृषी तंत्रनिकेतन गारगोटी येथील वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री. बी.सी देसाई यांनी करुन प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा सांगितला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र शासन शेतीमित्र पुरस्कार प्राप्त श्री शरद देवेकर यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असणाऱ्या कौशल्याचा उपयोग करून येणाऱ्या अडीअडचणीचा सामना करून आपल्या कृषी उद्योगाची भरभराट करावी. कृषी व्यवसायात यश प्राप्त कसे करावे हे त्यांनी आपल्या स्वतःच्या उदाहरणावरून सिद्ध केले. कृषी तंत्र निकेतनच्या प्राचार्या सौ पी.पी.देसाई यांनी कॉलेजमधील बौद्धिक व प्रात्यक्षिक कामाबद्दल केल्या जाणाऱ्या कार्याचा उहापोह केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अरविंद चौगले यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांनी आपल्या क्षेत्रात सातत्याने प्रयत्न करणे. कोणतेही भिडभाड न ठेवता कृषी निविष्ठांचे विक्री करावी. त्यासोबत बाजार मागणी व पुरवठा यांचा वेळोवेळी अभ्यास करावा असे सुचित केले.
विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवल्याबद्दल उपस्थितांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देऊन सत्कार करण्यात आला. दुपारच्या सत्रात विविध गुण दर्शनाच्या कार्यक्रमात विविध गुणदर्शन सांस्कृतीक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. गिरिजा जोशी मॅडम व कु. समृद्धी पावले यांनी केले. तसेच श्री सुजय पोफळे यांनी आभार व्यक्त केले.