क्राईमताज्या घडामोडी

प्रेमाला विरोध केल्याने प्रियकराच्या मदतीने मुलीकडून माता-पित्यासह, बहिणीचा खून: ‘लिव्ह-इन’मध्ये राहण्यास विरोध केल्याने कृत्य

प्रेमाला विरोध केल्याने प्रियकराच्या मदतीने मुलीकडून माता-पित्यासह, बहिणीचा खून


लिव्ह-इन’मध्ये राहण्यास विरोध केल्याने कृत्य


सिंहवाणी ब्युरो, बंगळूर
प्रियकरासोबत राहण्यास आई-वडिलांनी विरोध केल्याने एका युवतीने आपल्या प्रियकराच्या मदतीने चक्क चाकूने वार करून आपले आई-वडील व लहान बहिणीची हत्या केली. काल रात्री उशिरा के. आर. पुरम येथील सिगेहळ्ळीमध्ये हे हत्याकांड घडले.

श्वेता असे त्या युवतीचे नाव असून, तिच्या प्रियकराचे नाव केतन असे आहे. दोघांनी मिळून श्वेताचे वडील सोमसुंदर (वय ५५), आई मुथुलक्ष्मी (४८) व लहान बहीण सुप्रिया (२०) यांच्यावर चाकूचे वार करून त्यांची हत्या केली. घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमसुंदर यांची मोठी मुलगी श्वेता ही तिचा प्रियकर केतनसोबत लग्न न करता लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी श्वेताच्या अशा वागण्याला तीव्र विरोध केला होता. श्वेताच्या या निर्णयावर रागावलेले सोमसुंदर हे आपल्या पत्नी व लहान मुलीसह श्वेताला समजावून घरी घेऊन जाण्यासाठी सिगेहळ्ळी परिसरातीलच ‘साई ग्रीन अपार्टमेंट’मध्ये आले होते.

आई-वडील व श्वेता-केतन यांच्यामध्ये जोरदार वाद होऊन वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. तेंव्हा संतापलेल्या श्वेता व तिचा प्रियकर केतन यांनी श्वेताचे वडील, आई व लहान बहिणीवर हल्ला केला. चाकूने भोसकल्याने आई मुथुलक्ष्मी व सुप्रिया या घरातच रक्ताच्या थारोळ्यात कोसळून जागीच मरण पावल्या. वडील सोमसुंदर हे जखमी अवस्थेतच कसेबसे उठून घरातून बाहेर पळाले. मात्र तेही गंभीर जखमी झाले असल्याने अपार्टमेंटच्या पायऱ्यांवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.

हे दृष्य पाहून स्थानिकांनी तत्काळ ही माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी धाव घेतलेल्या पोलिसांनी सोमसुंदर यांना ताबडतोब ईस्ट पॉईंट रुग्णालयात दाखल केले. मात्र, अतिरक्तस्त्राव झाल्याने वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. अंतिम श्वास घेण्यापूर्वी त्यांनी उपस्थित पोलिसांना घटनेचा वृत्तांत कथन केला. के. आर. पुरम पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी मृतदेह विच्छेदनासाठी ईस्ट पॉंईंट रुग्णालयात पाठवले. खून करून फरार झालेल्या श्वेता व केतन यांना शोधण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार करून शोधमोहीम तीव्र केली आहे.


वडिलांची आप बिती
सोमसुंदर यांनी शेवटचा श्वास घेण्यापूर्वी रुग्णालयात नेण्यात येत असताना पोलिसांना सांगितले की, माझ्या मोठ्या मुलीने व तिच्या प्रियकराने माझ्यावर, माझी पत्नी व लहान मुलगी सुप्रियावर चाकूने हल्ला केला. माझी पत्नी व मुलगी रक्ताच्या थारोळ्यात घरात पडले आहेत. श्वेता व तिचा प्रियकर केतन हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. तिला समजावून घरी घेऊन जाण्यासाठी आलो होतो. त्यांनी आमच्याशी वाद उकरून काढून चाकूहल्ला केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button