कराड मधील वाहतूक कोंडीची चिंता मिटली, उड्डाणपुलावरून हलक्या वाहनाच्या वाहतुकीला हिरवा कंदील

कराड मधील वाहतूक कोंडीची चिंता मिटली,
उड्डाणपुलावरून हलक्या वाहनाच्या वाहतुकीला हिरवा कंदील
सिंहवाणी ब्युरो कराड:
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या कराड युनिक उड्डाणपुलाच्या वाहतुकीला हिरवा कंदील दाखवला. सातारा-कोल्हापूर लेनवरून मंत्री, खासदारांसह आमदारांच्या वाहनांचे ताफे प्रथम धावले. त्यानंतर कोल्हापूरकडे जाणारी हलकी वाहने सुसाट गेली. या बहुचर्चित उड्डाणपुलाची रविवारी चाचणीचा प्रारंभ खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्यामलकापूर येथील युनिक उड्डाणपुलाच्या विविध चाचण्या सध्या सुरू केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच ३५ टन वजनाच्या १२ गाड्या ठिकठिकाणी २४ तास उभ्या करून लोड टेस्टिंग करण्यात आले. सातारा-कोल्हापूर लेनचे काम बहुतांशी पूर्ण झाले असल्याने या लेनवरून हलक्या वाहनाची वाहतूक सुरू करून चाचणी करण्याचा निर्णय महामार्ग प्राधिकरणसह अदानी व डीपी जैनच्या अधिकाऱ्यांनी घेतला होता. 
या चाचणीचा प्रारंभ रविवार, खासदार उदयनराजे भोसले, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले भोसले, आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या उपस्थितीत केला. सातारा-कोल्हापूर लेनवरून मंत्री, खासदारांसह आमदारांच्या वाहनांचे ताफे प्रथम धावले. त्यानंतर कोल्हापूरकडे जाणारी हलकी वाहने या उड्डाण पुलावरून सोडण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या लेनवरून हलकी वाहने धावणार आहेत.
यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, धैर्यशील कदम, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनावले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले, महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक संजय कदम, अदानी व डीपी जैन कंपनीचे अधिकार व कर्मचारी उपस्थित होते.
कराडसह मलकापूरच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा
पहिल्या टप्प्यातील वाहतूक सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिक, व्यापारी आणि महामार्गावरील प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेला हा उड्डाणपूल कराड व मलकापूरच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणारा ठरणार आहे. महामार्गावरील प्रवासाला नव्या गतीची जोड मिळणार असल्याची भावना नागरिक, वाहनधारक, प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून शेंद्रे ते कागल या महामार्गाच्या सहापदरीकरण प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. त्याचे ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यापैकी कराड व मलकापुरातील उड्डाणपूल हा महत्त्वाचा टप्पा होता. तो आज सुरू होतोय. या उड्डाणपुलाची एक लेन आज सुरू होत आहे. तर दुसरी लेन ३० तारखेपर्यंत सुरू होईल. हा दुहेरी पूल वापरात येणार असल्यामुळे कराडसह मलकापूर शहराच्या दृष्टीने हा आनंदाचा क्षण आहे. – शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री