मलकापूरचे ‘मंगलपूर’ नामांतर रद्द; ग्रामस्थांच्या एल्गारानंतर प्रशासनाची माघार

मलकापूरचे ‘मंगलपूर’ नामांतर रद्द; ग्रामस्थांच्या एल्गारानंतर प्रशासनाची माघार
सिंहवाणी ब्युरो | मलकापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील मलकापूरचे नाव बदलून ‘मंगलपूर’ करण्याच्या प्रस्तावाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवत नगरपालिकेवर भव्य मोर्चा काढला. शिवतीर्थ ते नगरपालिका असा निघालेल्या या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चादरम्यान ग्रामस्थांनी ‘मलकापूरचे नाव बदलण्याचा ठराव तात्काळ रद्द करावा’ अशी जोरदार मागणी केली. नागरिकांच्या वाढत्या रोषाची दखल घेत प्रशासनाने संबंधित ठराव रद्द करण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी नगरपालिकेत मलकापूरचे नाव ‘मंगलपूर’ करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. नगराध्यक्ष रश्मी कोठावळे यांनी याबाबत माहिती दिली होती. मात्र या निर्णयाला सुरुवातीपासूनच नागरिकांचा मोठा विरोध होता. त्यानंतर ठराव स्थगित करण्यात आला होता.
परंतु ठराव केवळ स्थगित न ठेवता पूर्णपणे रद्द करावा, या मागणीसाठी नागरिक पुन्हा रस्त्यावर उतरले. भव्य मोर्चा आणि जनआक्रोशामुळे अखेर नगराध्यक्षांनी ठराव रद्द करण्याचे लेखी आश्वासन दिले.
यावेळी आंदोलकांनी स्पष्ट इशारा देत, “मलकापूरचे नाव मलकापूरच राहिले पाहिजे. भविष्यात पुन्हा नामांतराचा प्रयत्न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा सज्जड इशारा प्रशासनाला दिला.
