क्रीडाताज्या घडामोडी

एम्बापेची हुकूमत संपली; फ्रान्सची हॅटट्रिक हुकली! स्पेनचा २-० दणदणीत विजय, फायनलमध्ये धडक

एम्बापेची हुकूमत संपली; फ्रान्सची हॅटट्रिक हुकली! स्पेनचा २-० दणदणीत विजय, फायनलमध्ये धडक


सिंहवाणी वेब टीम :
फिफा वर्ल्ड कप २०२६ च्या पहिल्या उपांत्य फेरीत स्पेनने गतविजेत्या फ्रान्सचा २-० असा पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. डॅलस येथील एटी अँड टी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत स्पेनने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व राखले.
सामन्याच्या २२व्या मिनिटाला मिकेल ओयार्झाबाल याने पेनल्टीवर अचूक गोल करत स्पेनला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात पेद्रो पोरो याने आणखी एक गोल झळकावत फ्रान्सच्या पुनरागमनाच्या आशांवर पाणी फेरले. अखेरपर्यंत ही आघाडी कायम राखत स्पेनने २-० असा विजय मिळवला.
एम्बापेचा प्रभाव निष्प्रभ; फ्रान्सची सलग तिसऱ्या फायनलची संधी हुकली
सलग तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या फ्रान्सला स्पेनच्या भक्कम बचावापुढे हार मानावी लागली. स्टार स्ट्रायकर किलियन एम्बापे याला संपूर्ण सामन्यात एकही शॉट गोलपोस्टच्या चौकटीत मारता आला नाही. त्यामुळे फ्रान्सला पिछाडी भरून काढता आली नाही.
डेम्बेलेचाही करिष्मा फिका
गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडीवर असलेले एम्बापे (८ गोल) आणि उस्मान डेम्बेले (५ गोल) या जोडीने स्पर्धेत यापूर्वी १३ गोल केले होते. मात्र, स्पेनच्या शिस्तबद्ध बचावासमोर दोघेही निष्प्रभ ठरले. एम्बापेने ३ प्रयत्न केले, तर डेम्बेलेचे दोन शॉट्स लक्ष्यावर गेले; मात्र त्यांना गोल करता आला नाही.
स्पेनची अभेद्य बचावफळी
यंदाच्या स्पर्धेत स्पेनने सात सामन्यांत केवळ एकच गोल स्वीकारला आहे. फ्रान्ससारख्या बलाढ्य संघालाही गोलशून्य राखत स्पेनने जेतेपदासाठी आपणच सर्वात प्रबळ दावेदार असल्याचे पुन्हा सिद्ध केले.
२०१० नंतर स्पेनने दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, २०१० मध्ये अंतिम फेरी गाठल्यानंतर स्पेनने विश्वचषक जिंकला होता. आता इतिहासाची पुनरावृत्ती करण्याच्या निर्धाराने स्पेन अंतिम सामन्यात उतरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button