ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मोठी बातमी! एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री❓ तातडीने दिल्लीला रवाना; मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग

मोठी बातमी!

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री❓ तातडीने दिल्लीला रवाना;

मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग


मुंबई / किशोर आबिटकर, सिंहवाणी ब्युरो :

 


राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज तातडीने दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आलेल्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या दौऱ्याकडे राज्यासह दिल्लीतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर शिंदे यांचा हा महत्त्वाचा दिल्ली दौरा मानला जात आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, ‘ऑपरेशन टायगर’नंतरचा हा शिंदे यांचा पहिलाच दिल्ली दौरा आहे. या राजकीय घडामोडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे शिंदे गटाचे केंद्रीय पातळीवरील राजकीय वजन वाढल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री पदाची संधीही मिळू शकते.
राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, या सहा खासदारांपैकी दोन जणांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्याही नावाची मंत्रीपदासाठी चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
लवकरच होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता असून, काही विद्यमान मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन फेरबदल होण्याचीही चर्चा आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्वाबाबतही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजकीय चर्चांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांच्या नावांचीही केंद्रीय मंत्रिपदासाठी चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
चर्चांना उधाण; अधिकृत भूमिका अद्याप नाही
राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते, तसेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात, अशाही चर्चा रंगल्या आहेत. तथापि, या सर्व घडामोडींना महायुतीतील कोणत्याही नेत्याने अधिकृत दुजोरा दिलेला नसून, सध्या या केवळ राजकीय चर्चाच असल्याचे सांगितले जात आहे.
आता शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर कोणते राजकीय संकेत मिळतात आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


टीप (सिंहवाणी): या वृत्तातील केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, संभाव्य मंत्रीपदे आणि राजकीय फेरबदल यासंदर्भातील बाबी अधिकृत घोषणेअभावी राजकीय चर्चांवर आधारित आहेत. अधिकृत निर्णय झाल्यानंतरच त्याला अंतिम स्वरूप प्राप्त होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button