कोल्हापुरात सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा गेट मीटिंग घेऊन केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी;

कोल्हापुरात सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा
गेट मीटिंग घेऊन केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी;
कोल्हापूर / सिंहवाणी ब्युरो :
दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले ज्येष्ठ समाजसुधारक, पर्यावरण कार्यकर्ते आणि पद्मश्री पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला कोल्हापूरातील गोकुळ कामगार संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क येथील मुख्य कार्यालय आणि शिरोली येथील मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कामगारांची गेट मीटिंग घेण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या भूमिकेचा तीव्र निषेध करण्यात आला आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सोनम वांगचुक गेल्या १९ दिवसांपासून उपोषणावर असून देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित NEET परीक्षेतील गैरव्यवहाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, केंद्र सरकार आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संघटनेने केला.
‘सरकारची भूमिका लोकशाहीला मारक’
गोकुळ कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी शाहीर निकम म्हणाले, “संविधानाने प्रत्येक नागरिकाला शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र आंदोलनकर्त्यांची साधी दखलही सरकार घेत नाही, ही लोकशाहीसाठी धोकादायक बाब आहे.”
‘विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतरही सरकार गंभीर नाही’
संघटनेचे पदाधिकारी शहाजी राजे भोसले यांनी NEET प्रकरणावर सरकारवर टीका करत विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावाचा प्रश्न उपस्थित केला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित विषयावर केंद्र सरकारने तातडीने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
गेट मीटिंगमध्ये घोषणांनी परिसर दणाणला
आंदोलनादरम्यान कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून “संविधान जिंदाबाद”, “सोनम वांगचुक आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, “केंद्रीय शिक्षण मंत्री राजीनामा द्या” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
या आंदोलनात जनरल सेक्रेटरी शाहीर निकम, अध्यक्ष मल्हार पाटील, अशोक पुणेकर, निवास पाटील, व्ही. डी. पाटील, लक्ष्मण पाटील, दत्ता बच्चे, शहाजी राजे भोसले, योगेश चव्हाण, संभाजी शेलार यांच्यासह गोकुळ दूध संघाचे कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले.
