कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खाजगी सावकारीच्या वादातून हल्ल्याची शक्यता, पोलिसांचा तपास वेगात

कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार;
खाजगी सावकारीच्या वादातून हल्ल्याची शक्यता, पोलिसांचा तपास वेगात
कोल्हापूर / सिंहवाणी ब्युरो :
कोल्हापूर शहरात शुक्रवारी रात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. भाजप कार्यकर्ते सुरज साखरे यांच्यावर नवीन वाशी नाका परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांकडून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
घटना घडल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने सुरज साखरे यांना रुग्णालयात दाखल केले. माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
खाजगी सावकारीच्या व्यवहारातून वाद?
प्राथमिक तपासात ही घटना खाजगी सावकारी आणि आर्थिक व्यवहारातील वादातून घडल्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. दोन हल्लेखोरांनी सुरज साखरे यांच्यावर गोळीबार करून घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. गोळी नेमकी शरीराच्या कोणत्या भागात लागली, किती फायर करण्यात आले, याबाबत अधिकृत माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नाही.
सीसीटीव्हीच्या आधारे तपास
घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याचे बारकाईने परीक्षण सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू असून आरोपींनी कोणत्या वाहनाचा वापर केला, याचाही शोध घेतला जात आहे. शहरातील विविध नाक्यांवर पोलिसांनी तपासणी मोहीम सुरू केली आहे.
शहरात भीतीचे वातावरण
भरवस्तीत झालेल्या या गोळीबारामुळे नवीन वाशी नाका परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अधिकृत माहितीची प्रतीक्षा
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास केला जात आहे. गोळीबारामागील नेमके कारण, आरोपींची ओळख आणि हल्ल्याचा उद्देश याबाबत अधिकृत माहिती तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
(अपडेट : सुरज साखरे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त केली आहेत. तपासाची दिशा आर्थिक व्यवहार आणि खाजगी सावकारीच्या वादाकडे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा आहे.)
