ताज्या घडामोडी

सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर, आंदोलन मात्र सुरूच “सरकारने जबाबदारी काळजीपूर्वक हाताळली नाही” : शरद पवार

सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर, आंदोलन मात्र सुरूच


सरकारने जबाबदारी काळजीपूर्वक हाताळली नाही” : शरद पवार

नवी दिल्ली / सिंहवाणी ब्युरो :
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांना शनिवारी पहाटे दिल्ली पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या उपोषणाचा हा २१ वा दिवस होता. प्रकृती खालावल्याने दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दीर्घकाळ उपोषण आणि शरीरातील पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) यामुळे वांगचुक अशक्त झाले असले तरी त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर सातत्याने वैद्यकीय देखरेख ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, आंदोलनस्थळ रिकामे करण्यात आल्यानंतरही आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याची घोषणा कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केली. वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर दिपके यांनी स्वतःही बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली असून २० जुलैच्या नियोजित संसदेवरील मोर्चाची तयारी सुरू असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे.
या घडामोडीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, “केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनातून सातत्याने होत आहे. शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी त्यांनी काळजीपूर्वक हाताळली नाही. त्याचा परिणाम हजारो विद्यार्थ्यांवर झाला. मात्र केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे इतर राजकीय पक्षही या आंदोलनाच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत.”
सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी आंदोलनाची धार कायम असल्याचे दिसून येत असून, पुढील काही दिवसांत या आंदोलनाला अधिक राजकीय स्वरूप येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button