धबधब्यांचा राजा ‘सवतकडा’ बनणार पर्यटकांचा नवा ‘हॉटस्पॉट’; आधुनिक सुविधांनी पर्यटनाला मिळणार नवी झेप: ना. आबिटकर

धबधब्यांचा राजा ‘सवतकडा’ बनणार पर्यटकांचा नवा ‘हॉटस्पॉट’;
आधुनिक सुविधांनी पर्यटनाला मिळणार नवी झेप: ना. आबिटकर
सिंहवाणी ब्युरो | गारगोटी
भुदरगड तालुक्यातील निसर्गरम्य सवतकडा धबधबा आता राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांच्या यादीत वेगाने स्थान मिळवू लागला आहे. वन विभागाच्या ‘वनपर्यटन राज्य योजना’ आणि ‘स्टेट इको-टुरिझम’ अंतर्गत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक पर्यटन सुविधांचे लोकार्पण आज सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या नव्या सुविधांमुळे सवतकडा परिसरात निसर्ग पर्यटनासोबतच साहसी पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे. पर्यटकांसाठी झिप लाईन, विविध एडव्हेंचर स्पोर्ट्स, चिल्ड्रेन्स पार्क, सोव्हेनिअर शॉप, विश्रांती सुविधा आणि पर्यटकांसाठी आवश्यक मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सवतकडा हे केवळ धबधबे पाहण्याचे ठिकाण न राहता संपूर्ण कुटुंबासाठी दिवसभराचा पर्यटन अनुभव देणारे आकर्षण केंद्र ठरणार आहे.
कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, “एक वर्षापूर्वी सवतकडा येथील सात धबधबे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले होते. राज्यात एकाच ठिकाणी सात धबधबे असलेले हे दुर्मीळ पर्यटनस्थळ असून, गेल्या वर्षभरात हजारो पर्यटकांनी येथे भेट दिली. आता नव्या साहसी सुविधांमुळे सवतकडाची ओळख राज्याच्या पर्यटन नकाशावर अधिक ठळक होईल.”
ते पुढे म्हणाले की, वन विभागाने सुरक्षिततेची सर्व काळजी घेत आधुनिक झिप लाईन आणि विविध साहसी खेळ विकसित केले आहेत. त्यामुळे तरुणांसह लहान मुले आणि संपूर्ण कुटुंबासाठी हा परिसर अधिक आकर्षक बनला आहे. भविष्यात या परिसरात आणखी पर्यटन सुविधा विकसित करण्याचाही सरकारचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी वन विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या सोव्हेनिअर शॉपचेही उद्घाटन करण्यात आले. तसेच तिरवडे येथील कडगाव वनपरिक्षेत्र कार्यालयातील नूतनीकरण केलेल्या कॅम्प ऑफिसचे उद्घाटन आणि परिसरात वृक्षारोपणही पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला मुख्य वनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए., उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाबा नांदेकर, उपसभापती अरुणा प्रशांत देसाई, वनपरिक्षेत्र अधिकारी ए. जी. तायनाक, सहाय्यक वनसंरक्षक वि. र. काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी आर. डी. चौगुले, स्थानिक लोकप्रतिनिधी, वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठळक मुद्दे
सवतकडा येथे आधुनिक पर्यटन सुविधांचे लोकार्पण.
झिप लाईन, एडव्हेंचर स्पोर्ट्स आणि चिल्ड्रेन्स पार्कची सुविधा.
पर्यटकांसाठी सोव्हेनिअर शॉप सुरू.
सात धबधब्यांमुळे सवतकडा राज्यातील दुर्मीळ पर्यटनस्थळ.
पर्यटनातून स्थानिक रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा.