ताज्या घडामोडी

सोनम वांगचूक आंदोलनाच्या समर्थनार्थ गारगोटीत उद्या निषेध आंदोलन


सोनम वांगचूक आंदोलनाच्या समर्थनार्थ गारगोटीत उद्या निषेध आंदोलन


गारगोटी / सिंहवाणी ब्युरो :
पर्यावरणप्रेमी व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांच्या दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भुदरगड तालुक्यातील इंडिया आघाडी व समविचारी संघटनांच्या वतीने गुरुवार, दि. 23 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता हुतात्मा चौक, गारगोटी येथे निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
आयोजकांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेच्या निषेधार्थ संविधानिक व लोकशाही मार्गाने हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात भुदरगड तालुक्यातील शिक्षणप्रेमी नागरिक, तरुण, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या आंदोलनाचे आवाहन तालुका काँग्रेस अध्यक्ष शामराव (दादा) देसाई, पुरोगामी विचार मंचाचे कॉ. सम्राट मोरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुका प्रमुख अविनाश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुका अध्यक्ष धनराज चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मायकल डिसुझा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बबन कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे नारायण कांबळे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका प्रमुख राहुल पाटील यांनी केले आहे.
आंदोलनात इंडिया आघाडी व समविचारी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button