E20 जनता पार्टीची सोशल मीडियावर धूम; ‘100% शुद्ध पेट्रोल’ची प्रमुख मागणी
कोल्हापूर / किशोर आबिटकर :
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) नंतर आता सोशल मीडियावर E20 जनता पार्टी या नव्या डिजिटल नागरिक अभियानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. E20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोलच्या मुद्द्यावर हे अभियान उभे राहिले असून, देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 सोबत 100 टक्के शुद्ध (इथेनॉल-फ्री) पेट्रोल उपलब्ध करून द्यावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनांमुळे काही काळ मागे पडलेला E20 पेट्रोलचा मुद्दा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. मीम्स, व्यंगचित्रे आणि माहितीपूर्ण पोस्टच्या माध्यमातून या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत असून, सोशल मीडिया हँडलवरील फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढत आहे.
E20 जनता पार्टी म्हणजे काय?
E20 जनता पार्टी हा कोणताही नोंदणीकृत राजकीय पक्ष किंवा अधिकृत संघटना नसून, तो सोशल मीडियावर सुरू झालेला स्वतंत्र नागरिक अभियान (Citizen Campaign) आहे. ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) आणि इन्स्टाग्रामवर हे अभियान सक्रिय असून, स्वतःला सामान्य वाहनचालकांचा आवाज असल्याचा दावा करते.
या अभियानाचे म्हणणे आहे की, सरकारने E20 पेट्रोलला प्रोत्साहन दिल्यास त्यास विरोध नाही; मात्र ग्राहकांना 100 टक्के शुद्ध पेट्रोल खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध असावा. कोणते इंधन वापरायचे, हा निर्णय ग्राहकांनीच घ्यावा, अशी त्यांची भूमिका आहे.

प्रमुख मागण्या
• प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 सोबत 100% शुद्ध (इथेनॉल-फ्री) पेट्रोल उपलब्ध करावे.
• वाहन उत्पादकांनी शिफारस केलेले इंधनच ग्राहकांना मिळावे.
• सामान्य नागरिकांच्या वाहनांवर इंधनविषयक प्रयोग सक्तीने लादू नयेत.
• ग्राहकांना आपल्या गरजेनुसार इंधन निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे.
• “आमची वाहने प्रयोगशाळा नाहीत” या भूमिकेचा सरकारने विचार करावा.
सोशल मीडियावर जोरदार मोहीम
E20 जनता पार्टीच्या नावाने स्वतंत्र सोशल मीडिया हँडल सुरू करण्यात आले असून, त्यावर E20 पेट्रोलबाबत सातत्याने माहिती, प्रश्न आणि जनजागृतीपर पोस्ट केल्या जात आहेत. अभियानात सहभागी होणाऱ्यांचे म्हणणे आहे की, भारतातील लाखो मध्यमवर्गीयांसाठी वाहन ही चैनीची वस्तू नसून रोजीरोटीचे साधन आहे. त्यामुळे इंधनाचा खर्च आणि इंजिनची कार्यक्षमता त्यांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करते.
राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचा दावा
या अभियानाच्या सोशल मीडिया हँडलवर स्पष्ट करण्यात आले आहे की, आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा विचारसरणीशी संबंध नाही. ग्राहकांचे हक्क, पारदर्शकता आणि E20 धोरणावर खुली सार्वजनिक चर्चा घडवून आणणे, हा या अभियानाचा उद्देश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
कॉकरोच जनता पार्टीशी तुलना
सोशल मीडियावर E20 जनता पार्टीची तुलना कॉकरोच जनता पार्टी (CJP) या डिजिटल अभियानाशी केली जात आहे. CJP ने व्यंग आणि सोशल मीडिया मोहिमेद्वारे NEET पेपरफुटीचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर पोहोचवला होता. त्यानंतर या प्रकरणात मोठे आंदोलन उभे राहिले आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला होता.
झपाट्याने वाढत आहेत फॉलोअर्स
E20 जनता पार्टीच्या सोशल मीडिया हँडलला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ‘X’ वरील फॉलोअर्सची संख्या काही तासांत 13 हजारांवरून 45 हजारांहून अधिक, तर इन्स्टाग्रामवर 8,800 वरून 1.44 लाखांपर्यंत पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे.
सिंहवाणी विश्लेषण
E20 जनता पार्टी हा सध्या केवळ सोशल मीडियावर सुरू असलेला नागरिकांचा डिजिटल उपक्रम असला, तरी इंधन धोरण, ग्राहकांचे हक्क आणि पर्यायाचा अधिकार या मुद्द्यांवर देशभरात मोठी चर्चा निर्माण करण्यात या अभियानाला यश मिळताना दिसत आहे.
Back to top button