जिल्हाताज्या घडामोडी

गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा सोहळा उत्साहात ‘गुरु-शिष्य परंपरेचे मोल अथांग’; विद्यार्थ्यांच्या मनोगतातून व्यक्त झाला कृतज्ञतेचा भाव

गारगोटी हायस्कूल व समर्थ कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा सोहळा उत्साहात

गुरु-शिष्य परंपरेचे मोल अथांग’; विद्यार्थ्यांच्या मनोगतातून व्यक्त झाला कृतज्ञतेचा भाव

गारगोटी / सिंहवाणी ब्युरो :
भुदरगड शिक्षण संस्था संचलित गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ कनिष्ठ महाविद्यालय येथे गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत भक्तिमय व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य मिलिंद पांगिरेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांना पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांचा सन्मान केला तसेच आशीर्वाद घेत कृतज्ञता व्यक्त केली. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व, शिक्षकांचे जीवनातील स्थान आणि संस्कारांचे मूल्य याविषयी प्रभावी मनोगते सादर केली.
यामध्ये शारदा पाटील, कार्तिकी पाटील, सई देसाई, रसिका घोटणे, अर्चना गडदे, अनुष्का देसाई, श्रावणी घोडके, स्वप्नील गुरव आणि पौर्णिमा फराकटे यांनी ओघवत्या शैलीत विचार मांडत उपस्थितांची मने जिंकली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य मिलिंद पांगिरेकर म्हणाले, “शिक्षकांचे कार्य केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हेच खरे शिक्षण आहे. गुरुंनी दाखविलेल्या मार्गावर चालल्यास विद्यार्थी निश्चितच यशस्वी आयुष्य घडवू शकतात.”
प्रा. सौ. रोहिणी निकम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांचे यश हेच शिक्षकांसाठी सर्वात मोठे गुरुदक्षिणेचे फलित असते. ज्ञानाबरोबरच मूल्ये, शिस्त आणि संस्कारांची जोपासना करणे ही प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी आहे.”
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विद्यार्थिनी अनुष्का देसाई हिने केले, तर प्रा. सौ. स्नेहा साळोखे यांनी उपस्थितांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमात गुरुजनांविषयीचा आदर, कृतज्ञता आणि भारतीय गुरु-शिष्य परंपरेचा गौरव अधोरेखित झाला. गुरुपौर्णिमेच्या या प्रेरणादायी सोहळ्यामुळे विद्यालय परिसर भक्ती, संस्कार आणि उत्साहाने भारावून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button