जिल्हाताज्या घडामोडीविशेष

शंभरपैकी तीन ई-बसेस कोल्हापुरात दाखल; ५० रुपयांत दिवसभर प्रवासाची सुविधा : कोल्हापूरच्या सार्वजनिक वाहतुकीत नवा अध्याय

शंभरपैकी तीन ई-बसेस कोल्हापुरात दाखल; ५० रुपयांत दिवसभर प्रवासाची सुविधा

 कोल्हापूरच्या सार्वजनिक वाहतुकीत नवा अध्याय


कोल्हापूर | सिंहवाणी ब्युरो :
केएमटीच्या गळक्या आणि जीर्ण बसांचे दिवस आता संपण्याच्या मार्गावर आहेत. शहरवासीयांना अत्याधुनिक, वातानुकूलित आणि जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभव देणाऱ्या पीएम ई-बस सेवा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या १०० ई-बसेसपैकी पहिल्या तीन बसेस गुरुवारी फरिदाबादहून कोल्हापुरात दाखल झाल्या. ऑगस्टमध्ये आणखी ४०, तर सप्टेंबरमध्ये उर्वरित ६० बसेस दाखल होणार असल्याची माहिती परिवहन सभापती सत्यजित जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विशेष म्हणजे, बसच्या तिकिटांच्या दरात कोणतीही वाढ होणार नसून, केवळ ५० रुपयांत दिवसभर केएमटीच्या कोणत्याही मार्गावर अमर्याद प्रवास करता येणार आहे.
केंद्र सरकारच्या पीएम ई-बस सेवा योजनेअंतर्गत केएमटीला १०० ई-बसेस मंजूर झाल्या आहेत. या बससेवेसाठी आवश्यक चार्जिंग स्टेशन, वीजपुरवठा आणि अन्य पायाभूत सुविधांसाठी ३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शहरात एकूण १८ चार्जिंग स्टेशन उभारली जाणार असून त्यापैकी सहा स्टेशन लवकरच कार्यान्वित होणार आहेत.
चार्जिंग स्टेशनची कामे अंतिम टप्प्यात
महावितरणकडून ३३ केव्ही क्षमतेच्या १० किलोमीटर अंडरग्राऊंड एचटी लाईनचे काम पूर्ण झाले आहे. एलटी लाईनचे सुमारे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून तीनपैकी दोन ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आले आहेत. उर्वरित ट्रान्स्फॉर्मर पुढील आठ दिवसांत बसविण्यात येणार आहे.
बससेवेचा विस्तार
नवीन ई-बसेसद्वारे शिरोली, गोकुळ शिरगाव आणि कागल एमआयडीसीपर्यंत सेवा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पन्हाळा, जोतिबा आणि आदमापूर येथील श्री बाळूमामा मंदिर या प्रमुख पर्यटन व श्रद्धास्थानांसाठीही नवीन बसमार्ग सुरू करण्याचा विचार सुरू आहे.
जेबीएम कंपनीकडे संचालनाची जबाबदारी
या प्रकल्पासाठी केंद्र शासनाने जेबीएम इकोलाईफ मोबिलिटी प्रा. लि. या कंपनीची बस ऑपरेटर म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीला डेपो वाटपाचे पत्र देण्यात आले असून पुढील पंधरा दिवसांत चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी डेपो ताब्यात दिला जाणार आहे.
ई-बसेसची वैशिष्ट्ये
वातानुकूलित आणि प्रदूषणमुक्त प्रवास
आरामदायी आसनव्यवस्था
सीसीटीव्ही कॅमेरे
फेस रेकग्निशन प्रणाली
दिव्यांगांसाठी स्वतंत्र तिसरा दरवाजा
व्हीलचेअर थेट बसमध्ये नेण्याची सुविधा
आपत्कालीन परिस्थितीत जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याची व्यवस्था
इंटरसिटी बससेवेलाही चालना
१०० बसेस पूर्णपणे ताफ्यात दाखल झाल्यानंतर कोल्हापूर–इचलकरंजी–सांगली या शहरांना जोडणारी कमी दरातील इंटरसिटी बससेवा सुरू करण्याचा मानस आहे. सध्या २० किलोमीटरपर्यंत मर्यादित असलेली केएमटी सेवा भविष्यात ५० किलोमीटरपर्यंत विस्तारली जाणार आहे. तसेच केएमटीसाठी स्वतंत्र आरटीओ अधिकारीही नियुक्त केला जाणार आहे.
ठेकेदाराला मिळणारे मानधन
९ मीटर बस: प्रति किलोमीटर ₹६४
१२ मीटर बस: प्रति किलोमीटर ₹७०.९४
बस धावली अथवा नाही, प्रत्येक बससाठी दररोज १८० किलोमीटरचे किमान भाडे अदा करावे लागणार.
ताफ्याची रचना
९ मीटर लांबीच्या बसेस: ५०
१२ मीटर लांबीच्या बसेस: ५०
९ मीटर बस क्षमता: उभ्या प्रवाशांसह ४२
१२ मीटर बस क्षमता: ५० प्रवासी
(सिंहवाणी विशेष)
कोल्हापूरच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी ई-बस सेवा हा मोठा टप्पा मानला जात असून, पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि आधुनिक प्रवासाचा नवा अध्याय यामुळे सुरू होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button