आदमापूर येथील बाळूमामा देवस्थानातील आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करा शिवसेना (ठाकरे गट)ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; १० ऑगस्टपर्यंत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

आदमापूर येथील बाळूमामा देवस्थानातील आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करा
शिवसेना (ठाकरे गट)ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; १० ऑगस्टपर्यंत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

गडहिंग्लज | सिंहवाणी ब्युरो
भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील श्री बाळूमामा देवस्थानातील कथित आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शिवसेना (ठाकरे गट)चे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. या वेळी उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री बाळूमामा देवस्थानात बकरी विक्री तसेच जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे. या कथित गैरव्यवहारामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे.
बकरी विक्री प्रकरणात सुमारे ७० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून, देवस्थानाच्या गेल्या २० वर्षांतील सर्व आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. चौकशीतून मोठ्या प्रमाणावर अनियमितता उघड होण्याची शक्यता असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
या प्रकरणात प्रशासनाने तातडीने कारवाई करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच १० ऑगस्टपर्यंत चौकशीबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली, याची माहिती जनतेसमोर जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
फोटो कॅप्शन :
आदमापूर येथील श्री बाळूमामा देवस्थानातील कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेना (ठाकरे गट)च्या पदाधिकाऱ्यांनी सादर केले.