जिल्हाताज्या घडामोडी

राधानगरी पर्यटन विकास प्राधिकरणाच्या कामास गती द्या : पालकमंत्री प्रकाश आबिटकर र १ ऑक्टोबरला पर्यटन प्रकल्पांचे लोकार्पण करण्याचे नियोजन

राधानगरी पर्यटन विकास प्राधिकरणाच्या कामास गती द्या : पालकमंत्री प्रकाश आबिटकर


१ ऑक्टोबरला पर्यटन प्रकल्पांचे लोकार्पण करण्याचे नियोजन

कोल्हापूर / सिंहवाणी ब्युरो :
राधानगरी वन्यजीव अभयारण्य, राधानगरी धरण आणि परिसरातील ८४ गावांसाठी जाहीर करण्यात आलेल्या विशेष पर्यटन विकास प्राधिकरणाच्या कामांना गती देण्याचे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी संबंधित विभागांना समन्वयाने काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले की, राधानगरी व दाजीपूर परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची जबाबदारी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) सोपविण्यात आली आहे. या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि सहसंचालक समाधान पाटील यांनी परस्पर समन्वय ठेवून प्रस्ताव अंतिम करावा.
आराखडा तयार करताना संबंधित गावांतील नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या सूचना आणि अपेक्षा विचारात घ्याव्यात, जेणेकरून पर्यटन विकासाबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत राधानगरी धरण, काळम्मावाडी धरण परिसर, शासकीय विश्रामगृहे, बोटॅनिकल गार्डन तसेच जिल्हा विकास निधीतून सुरू असलेल्या विविध पर्यटन विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या सर्व प्रकल्पांचे १ ऑक्टोबर रोजी लोकार्पण करण्याचे नियोजन असल्याची माहिती पालकमंत्री आबिटकर यांनी दिली.
या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन, राधानगरी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, विभागीय वन्यजीव अधिकारी श्रीकांत पवार, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय भनगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे भाऊसाहेब हजारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्य मुद्दे :
राधानगरी वन्यजीव अभयारण्य, धरण व ८४ गावांसाठी विशेष पर्यटन विकास प्राधिकरण.
डीपीआर तयार करण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश.
स्थानिक नागरिकांच्या सूचनांचा आराखड्यात समावेश करण्यावर भर.
राधानगरी, दाजीपूर, काळम्मावाडी परिसरातील पर्यटन प्रकल्पांचा आढावा.
१ ऑक्टोबरला पर्यटन विकास कामांचे लोकार्पण करण्याचे नियोजन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button