बौद्ध विद्यार्थी वस्तीगृहात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिन साजरा

बौद्ध विद्यार्थी वस्तीगृहात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिन साजरा
जवळा बाजार | सिंहवाणी ब्युरो :
जवळा बाजार येथील बौद्ध विद्यार्थी वस्तीगृहात भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे आद्य प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महापुरुषांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास राहुल थोरात, युवा नेते अजिंक्य कठाळे, पावडे सर, श्रीपाद जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना ॲड. रहीम शेख यांनी लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रकार्याचा तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनप्रवास व साहित्यसंपदेचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे भविष्य घडविण्याचा आणि समाजासाठी योगदान देण्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
वस्तीगृहाचे अधीक्षक किरण मोरे यांनी लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी विचारांचे महत्त्व विशद केले. “जग बदल घालूनी घाव” या अण्णाभाऊंच्या विचारांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांनी जिद्द, परिश्रम आणि प्रामाणिकपणाच्या बळावर यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वस्तीगृहातील सर्व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. उपस्थितांनी महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करत सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा घेण्याचा संकल्प केला.