आंतरवासिता म्हणजे शिक्षकत्वाची खरी परीक्षा – डॉ. रत्नाकर म्हस्के

आंतरवासिता म्हणजे शिक्षकत्वाची खरी परीक्षा – डॉ. रत्नाकर म्हस्के
तासगाव | सिंहवाणी ब्युरो / प्रा. प्रमोद शेंडगे
संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, तासगाव येथे बी.एड. अभ्यासक्रमाच्या शालेय आंतरवासिता (School Internship) टप्पा क्रमांक–२ निमित्त प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींसाठी शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. रत्नाकर म्हस्के होते. अध्यक्षीय समारोपात त्यांनी सांगितले की, “शालेय आंतरवासिता हा केवळ अभ्यासक्रमाचा भाग नसून शिक्षकत्वाची खरी परीक्षा आहे.” या कालावधीत विद्यार्थी-शिक्षकांनी आत्मविश्वास, शिस्त, प्रामाणिकपणा आणि समर्पणाच्या भावनेने अध्यापन करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करावे. प्रत्येक अनुभवातून शिकत आदर्श शिक्षक बनण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
आंतरवासिता प्रमुख डॉ. अर्चना चिखलीकर यांनी शालेय आंतरवासितेची उद्दिष्टे, नियोजन, दैनंदिन नोंदी, अध्यापनाची गुणवत्ता, शालेय उपक्रमांतील सहभाग तसेच व्यावसायिक आचारसंहितेचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आंतरवासितेतील प्रत्येक दिवस हा स्वतःला सक्षम शिक्षक म्हणून घडविण्याची संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. देवदत्त खजूरकर यांनी प्रभावी अध्यापन नियोजन व अध्यापन कौशल्ये, प्रा. अंकुश पंडित यांनी शालेय व्यवस्थापन, व्यक्तिमत्त्व विकास व नेतृत्वगुण, तर प्रा. प्रमोद शेंडगे यांनी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, शैक्षणिक साधनांचा प्रभावी वापर आणि आंतरवासितेतील विविध उपक्रमांचे नियोजन याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास बी.एड. भाग-दोनच्या सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आगामी शालेय आंतरवासितेसाठी त्यांना शुभेच्छा देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.