आरोग्य व शिक्षणजिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गारगोटीला मेडिकल हब बनविणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक सीटी स्कॅन, 2D इको, डिजिटल एक्स-रे व ट्रू-नॉट मशीनचे लोकार्पण

गारगोटीला मेडिकल हब बनविणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक सीटी स्कॅन, 2D इको, डिजिटल एक्स-रे व ट्रू-नॉट मशीनचे लोकार्पण


गारगोटी | सिंहवाणी ब्युरो
भुदरगडसह परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणिअत्याधुनिक आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी गारगोटीला मेडिकल हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे, अशी घोषणा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली.

गारगोटी उपजिल्हा रुग्णालयात नव्याने बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती सारिका नांदेकर, पंचायत समिती सभापती विक्रमसिंह पाटील, उपसभापती अरुणा देसाई, आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर, गटविकास अधिकारी शेखर जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले की, हृदयविकाराचा झटका, गंभीर अपघात किंवा सीटी स्कॅनसारख्या तपासण्यांसाठी आतापर्यंत कोल्हापूरला जावे लागत होते. मात्र आता गारगोटी उपजिल्हा रुग्णालयातच या सर्व सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील रुग्णांचा वेळ, पैसा आणि जीव वाचण्यास मोठी मदत होणार आहे.
रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या सुविधांमध्ये सीटी स्कॅन मशीन, 2D इको मशीन, 300 MA डिजिटल एक्स-रे मशीन आणि ट्रू-नॉट मशीन यांचा समावेश असून त्यामुळे हृदयविकार, अपघात, संसर्गजन्य आजार तसेच इतर गंभीर आजारांचे अचूक व जलद निदान शक्य होणार आहे.
१५ ऑगस्टनंतर आधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया
गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत १५ ऑगस्टनंतर आधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया केंद्र सुरू होणार असून त्यामुळे नागरिकांना सांगली, मिरज किंवा कोल्हापूर येथे जाण्याची गरज भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
१०० बेडचे रुग्णालय, कॅथलॅबचीही सुविधा
गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाचे ५० वरून १०० बेडमध्ये श्रेणीवर्धन करण्यात येणार असून राधानगरी, सोळांकुर आणि तारळे येथील रुग्णालयांचेही श्रेणीवर्धन होणार आहे. तसेच गारगोटी येथे कॅथलॅब सुविधा उपलब्ध करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयात कॅन्सर निदानासाठी पीईटी स्कॅन मशीन उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस असल्याचेही पालकमंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा परिषद आरोग्य सभापती सारिका नांदेकर, डॉ. चरित भोजराज, भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील आणि अमित धारक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिलीप माने यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सरिता थोरात यांनी केले.
कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ठळक मुद्दे
गारगोटीला ‘मेडिकल हब’ म्हणून विकसित करण्याची घोषणा.
सीटी स्कॅन, 2D इको, डिजिटल एक्स-रे व ट्रू-नॉट मशीनचे लोकार्पण.
१५ ऑगस्टपासून आधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुविधा.
उपजिल्हा रुग्णालयाचे ५० वरून १०० बेडमध्ये श्रेणीवर्धन.
भविष्यात कॅथलॅब आणि पीईटी स्कॅनसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्याचा मानस.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button