रशियन परराष्ट्र धोरणाचे तज्ज्ञ डॉ. संजय देशपांडे यांचे निधन; एक शांत, करारी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड

रशियन परराष्ट्र धोरणाचे तज्ज्ञ डॉ. संजय देशपांडे यांचे निधन;
एक शांत, करारी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड
मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर सेंट्रल युरेशियन स्टडीजचे संचालक आणि रशियाच्या परराष्ट्र धोरणाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. संजय देशपांडे यांचे मंगळवारी, दि. १० ऑगस्ट रोजी मुंबईत निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आजारानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने रशिया, मध्य आशिया आणि युरेशियाच्या राजकारणाचा सखोल अभ्यास करणारे एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व हरपले आहे.
डॉ. देशपांडे यांनी मॉस्को येथील पीपल्स फ्रेंडशिप युनिव्हर्सिटीमधून पदव्युत्तर आणि डॉक्टरेट पदवी प्राप्त केली होती. रशिया व मध्य आशियातील अंतर्गत घडामोडी, युरेशियातील देशांचे परराष्ट्र धोरण आणि या प्रदेशातील भू-राजकारण हे त्यांच्या अभ्यासाचे प्रमुख विषय होते.
डॉ. देशपांडे यांच्याशी काही वर्षांपूर्वी मॉस्को येथे परिचय झाला. पुश्किन विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत मी ‘बुद्ध आणि मार्क्स यांची दुःखमीमांसा : एक तुलनात्मक अभ्यास’ हा पेपर सादर केला होता. या परिषदेच्या नियोजनाची महत्त्वाची जबाबदारी डॉ. संजय देशपांडे यांनी सांभाळली होती.
परिषदेच्या निमित्ताने त्यांच्यासोबत मॉस्कोच्या रेड स्क्वेअरमध्ये फिरताना आणि हॉटेलवर झालेल्या मनमोकळ्या गप्पांमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वेगळीच ओळख झाली. अतिशय शांत स्वभाव, पण विचारांमध्ये कमालीची स्पष्टता आणि करारीपणा, अशी त्यांची छाप मनावर उमटली.
काही दिवसांपूर्वी त्यांचा विद्यार्थी डॉ. योगेश यांच्याकडून देशपांडे गंभीर आजारी असल्याचे समजले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी संदेश पाठवून आपण जीवनातील अतिशय कठीण परिस्थितीतून जात असल्याचे सांगितले. बोलताना त्रास होत असल्याने त्यांनी लिखित स्वरूपात संवाद साधण्याची विनंती केली. त्यानुसार १२ जुलै रोजी आमच्यात लिखित स्वरूपात थोडा संवाद झाला. मात्र, ते इतक्या लवकर आपल्यातून निघून जातील, अशी कल्पनाही केली नव्हती.
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने मॉस्को येथे झालेल्या कार्यक्रमाच्या नियोजनातही डॉ. देशपांडे यांचा मोलाचा सहभाग होता. त्या कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहता आले, हे आमचे भाग्यच. अण्णाभाऊ साठे मॉस्को दौऱ्यात ज्या हॉटेलमध्ये उतरले होते, त्या ठिकाणीही आम्ही डॉ. देशपांडे यांच्यासोबत गेलो होतो. त्या आठवणी आता अधिकच मौल्यवान झाल्या आहेत.
डॉ. संजय देशपांडे हे केवळ रशियन परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक नव्हते, तर भारत-रशिया संबंध, युरेशियातील बदलती राजकीय समीकरणे आणि जागतिक राजकारणाकडे चिकित्सक दृष्टीने पाहणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने एका मोठ्या विद्वानाची आणि संवेदनशील माणसाची उणीव निर्माण झाली आहे.
एक मोठे व्यक्तिमत्त्व काळाच्या आड गेले आहे. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
लाल सलाम!
— डॉ. सुभाष के. देसाई
