जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची किनवटला भेट: आमदार भीमराव केराम यांनी घेतली सदिच्छा भेट; तालुक्यातील विविध प्रश्न व विकासात्मक विषयांवर चर्चा

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची किनवटला भेट

आमदार भीमराव केराम यांनी घेतली सदिच्छा भेट; तालुक्यातील विविध प्रश्न व विकासात्मक विषयांवर चर्चा

किनवट / सिंहवाणी ब्युरो – संजय घोगरे :
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मंगळवारी किनवट तालुक्याच्या दौऱ्यावर येत वझरा येथे भेट दिली. त्यांच्या या दौऱ्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. यावेळी आमदार भीमराव केराम यांनी माजी उपराष्ट्रपती धनखड यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत व सत्कार केला. या भेटीदरम्यान किनवट तालुक्यातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांसह विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

दरम्यान, धनखड यांनी वझरा येथे येईलवाड कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी जगन्नाथ येईलवाड यांचे जुलै महिन्यात निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांची भेट घेऊन धनखड यांनी शोकसंवेदना व्यक्त केली.

जगन्नाथ येईलवाड हे दार्जिलिंगचे पोलीस अधीक्षक श्रीकांत येईलवाड यांचे वडील होते. धनखड यांनी येईलवाड कुटुंबीयांशी संवाद साधत दिवंगत जगन्नाथ येईलवाड यांच्या आठवणींना उजाळा दिला. दुःखाच्या प्रसंगी कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी कुटुंबीयांना धीर दिला.

तालुक्यातील प्रश्नांवरही चर्चा

माजी उपराष्ट्रपतींच्या भेटीदरम्यान आमदार भीमराव केराम यांनी किनवट तालुक्यातील विविध प्रश्न आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर यावेळी विचारविनिमय झाला.

विशेषतः ग्रामीण व आदिवासी भागातील विकास, स्थानिक पातळीवरील मूलभूत सुविधा आणि नागरिकांशी संबंधित प्रश्न याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. माजी उपराष्ट्रपतींच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा स्थानिक विकासासाठी उपयोग व्हावा, या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

नागरिकांमध्ये उत्सुकता

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या किनवट तालुक्यातील आगमनाची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. वझरा येथे झालेल्या या भेटीदरम्यान आमदार भीमराव केराम यांच्यासह स्थानिक नागरिक व मान्यवर उपस्थित होते.

एकीकडे दिवंगत जगन्नाथ येईलवाड यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट आणि दुसरीकडे स्थानिक विकासाच्या प्रश्नांवर झालेली चर्चा, यामुळे धनखड यांचा किनवट दौरा लक्षवेधी ठरला. त्यांच्या या भेटीमुळे तालुक्यातील विविध प्रश्नांना वरिष्ठ पातळीवर मांडण्यासाठी एक नवा संवादाचा मार्ग उपलब्ध झाल्याची भावना स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button