जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

करडवाडीच्या उसाच्या शेतात बिबट्याच्या दोन पिलांचे वास्तव्य! :दोन महिन्यांपूर्वी याच परिसरात बिबट्याची होती दहशत; आता पिले रस्त्याकडेला दिसू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

करडवाडीच्या उसाच्या शेतात बिबट्याच्या दोन पिलांचे वास्तव्य!

दोन महिन्यांपूर्वी याच परिसरात बिबट्याची होती दहशत;

आता पिले रस्त्याकडेला दिसू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

गारगोटी / सिंहवाणी ब्युरो – करडवाडी :
गारगोटी-पाटगाव मार्गालगत करडवाडी (ता. भुदरगड) हद्दीत पुन्हा एकदा बिबट्याच्या अस्तित्वाची चर्चा सुरू झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी याच परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे आढळून आले होते. वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्नही केले होते. आता त्याच परिसरातील उसाच्या शेतात बिबट्याची दोन लहान पिले वावरताना दिसून आल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

करडवाडी गावच्या हद्दीत संजय मारुती देसाई (सोनाळी) यांच्या उसाच्या शेतात ही दोन पिले अनेकांच्या निदर्शनास आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून पिले शेतात वावरताना दिसत असून, काही वेळा ती रस्त्याच्या कडेलाही येत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. त्यामुळे या परिसरातून ये-जा करणारे नागरिक, शेतकरी आणि विशेषतः शेतात काम करणाऱ्या मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दोन महिन्यांपूर्वी याच परिसरात बिबट्याचा वावर

जून-जुलै महिन्यात करडवाडी परिसरात एका बिबट्याचा अनेक दिवस वावर होता. बिबट्याच्या हालचालींमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्यावेळी वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, बिबट्या वन विभागाच्या हाती लागला नसल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात येत आहे.

आता त्याच परिसरात बिबट्याची दोन लहान पिले आढळून आल्याने ही पिले त्याच मादी बिबट्याची असावीत, असा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत. मादी बिबट्याने पिलांना जन्म दिल्यानंतर ती जंगलाच्या दिशेने गेली असावी, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

पिले सुमारे दीड महिन्यांची असल्याचा अंदाज

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही पिले अत्यंत लहान असून सुमारे एक ते दीड महिन्यांची असावीत, असा प्राथमिक अंदाज आहे. पिले उसाच्या शेतात असल्याने त्यांची आई आजूबाजूच्या परिसरात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केवळ पिले दिसली म्हणून त्यांना हाताळणे किंवा पकडण्याचा प्रयत्न करणे धोकादायक ठरू शकते.

वन विभागाने तातडीने पाहणी करावी

बिबट्याच्या पिलांचे वास्तव्य स्पष्ट झाल्याने वन विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून होत आहे. पिलांना कोणताही धोका निर्माण होणार नाही, तसेच मादी बिबट्यापासून त्यांची ताटातूट होणार नाही, याची काळजी घेत वन विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पिलांना थेट पकडून इतरत्र हलविण्याऐवजी वन्यजीव तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मादी बिबट्याचा शोध, पिलांची सुरक्षितता आणि परिसरातील नागरिकांची सुरक्षा यांचा समन्वय साधून निर्णय घ्यावा, अशीही स्थानिकांची भूमिका आहे.

शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन

उसाच्या शेतात पिलांचे वास्तव्य असल्याने शेतकऱ्यांनी सध्या विशेष काळजी घेण्याची गरज आहे. पिले दिसल्यास त्यांच्याजवळ जाणे, त्यांना हात लावणे, गर्दी करणे अथवा त्यांचे फोटो-व्हिडिओ काढण्यासाठी जवळ जाणे टाळावे. मादी बिबट्या आसपास असण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

करडवाडी परिसरातील बिबट्याचा हा नवा वावर वन विभागासाठीही गांभीर्याचा विषय ठरला असून, पिलांची सुरक्षितता आणि नागरिकांची सुरक्षा यामध्ये योग्य समन्वय साधत वन विभाग आता कोणती भूमिका घेतो, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button